🛑 खारेपाटण शेर्पे केंद्रस्तरीय तिसरी संयुक्त शिक्षण परिषद संपन्न
चिंचवली : माहे ऑक्टोबर महातील शिक्षण परिषद नुकतीच चिंचवली मधली शाळेत उत्साहात संपन्न झाली. त्यावेळी विविध शैक्षणिक विषयांवर अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. दीपप्रज्वलन करुन शिक्षण परिषदेची सुरुवात करण्यात आली.
मोहिनी साळुंखे आणि प्रवीण कासार यांनी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणोत्तर कार्य या विषयावर मुद्देसूद मार्गदर्शन केले. इंग्रजी पायाभूत रचना या विषयावर उपशिक्षिका प्रिया झगडे यांनी उदाहरणे देत संवाद साधला. दिव्यांग अध्ययन स्तर निश्चिती या विषयाचे मार्गदर्शन नाजमीन मुल्ला यांनी केले. तसेच शेर्पे खारेपाटण कासार्डेचे केंद्रप्रमुख संजय पवार यांनी तपशीलवार प्रशासकीय मार्गदर्शन केले. CMP प्रणाली विषयी त्यांनी विशेष मार्गदर्शन केले.
त्यावेळी व्यासपीठावर केंद्रमुख्याध्यापक प्रदिप श्रावणकर , केंद्रमुख्याध्यापक दशरथ शिंगारे , श्रीपाद बागडी , सखाराम बागडी , खारेपाटण हायस्कुलच्या माजी प्राचार्या रानडे उपस्थित होते. चिंचवली मधली शाळेच्या मुख्याध्यापिका सविता दाबेराव यांनी सर्वांचे गुलाबपुष्प देऊन यथोचित स्वागत केले. अमोल भंडारी यांनी शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन केले. चिंचवली मधली शाळेने उत्तम नियोजन केल्याबद्दल केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेच्या वतीने आभार मानण्यात आले.






















































